नांदेड (प्रतिनिधी) जीवनात जेव्हा इतरांकडून तुमचा द्वेष, मत्सर, ईर्षा, निंदा होत असते, त्यावेळी तुमची वाटचाल प्रगतीपथावर, असे समजा. वेळोवेळी होणारा अपमान, अपशब्द म्हणजे एकप्रकारे विष आहे, देवाधी देव महादेवालाही ते चुकले नाही, शंकरानेही जेव्हा विष प्राशन केले, तेव्हाच ते निलकंठेश्वरधारी बनले. त्यामुळे अशा निंदा-द्वेष करणार्यांकडे दुर्लक्ष करा,तुमचे गुणगान करणार्यांपेक्षा तुमच्यावर जळफळाट करणार्यांची संख्या वाढते तेव्हा तुम्ही यशाकडे मार्गस्थ होत आहात, असेच समजा असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवशीच्या कथावाचनात केले. उद्या गुरुवारी शिवमहापुराण कथेची समाप्ती असून सकाळी 8 ते 11 या या दरम्यान ही कथा होणार असल्याने भाविकांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आज प्रारंभीच पूज्य प्रदीपजी मिश्रा यांनी श्रावणकुमारच्या कथेचे वाचन केले. श्रावणबाळाच्या मातापित्याला डोळे नव्हते, असे सांगितले जाते, परंतु शिवमहाुराणात या मातापित्याला डोळे होते, असा उल्लेख आहे. अपत्यप्राप्तीसाठी मातापित्याने अनंत उपासना केल्यानंतरही त्यांच्या भाग्यात संततीप्राप्ती नव्हती. शिवशंकराकडे याचना केल्यानंतर महादेवाने संतती सुख दिले,परंतु या दोघांनाही अंधत्व आले. आयुष्यभर मुलाचे मुख पाहता येणार नाही, असे शंकराने सांगितले. आपल्या अंध मातापित्याची सेवा करणार्या श्रावणबाळाच्या कथेचा मतीतार्थ सांगताना पंडितजींनी समाजात मातापित्याची सेवा करणार्या मुलांची संख्या प्रचंड कमी होत असल्याचे सांगून ज्या घरात वृद्ध आईवडिलांची सेवा होते, त्या घरातील वृद्धांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ कधीच येणार नाही, असा उपदेश केला.
शिवजी मोठे भोळे आहेत, आपल्या भक्ताचे दुःख त्याच्या चेहर्यावरूनच जाणतात, त्यामुळे त्यांच्याकडे काही मागताना अनेकदा विचार करून मागा, आपला स्वार्थ पाहू नका, विश्वकल्याणाचा संकल्प करा, मनुष्य आपले संपूर्ण जीवन थाटमाट करण्यात, बडेजाव करण्यात घालतो, महागडे कपडे, महागड्या गाड्या, महागड्या वस्तु, ऐशआरामात राहतो, परंतु हे सर्व काही निश्चित काळासाठी आहे, याचे भान त्याला राहत नाही.मनाची शांती, प्रेम, वात्सल्य,करुणा, समाधान, भक्ती, उपासना हाच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी कितीही विलंब होत असला तरी शिवजींना जलार्पण करायचा नित्यनियम सोडू नका, तो एक ना एक दिवस तुमच्या उपासनेचे कायमचे फळ निश्चितच देईल. भोलेनाथावर विश्वास ठेवा.
व्यापारासाठी, नोकरीसाठी, परीक्षेसाठी भरपूर परिश्रम करा, शिवपिंडावर जलार्पण करीत रहा, यश मिळणारच यावर विश्वास ठेवा. ‘कुछ मेहनत हाथ की, बाकी कृपा भोलेनाथ की’ या आत्मविश्वासाने वाटचाल करा, असा संदेश पंडितजींनी भाविकांना दिला. यशासाठी श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीरामालाही शिव आराधना करावी लागल्याचेही त्यांनी सांगितले. सहाव्या दिवशी कथामंडपात सकाळपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली होती. कथास्थळी तिन्ही मंडप भाविकांनी खचाखच भरले होते. मंडपाबाहेरही त्यापेक्षा अनेक पटीने भाविकांनी जिथे जागा मिळेल तिथे बसून कथाश्रवण केली.