हिमायतनगर| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा युवा नेते माधवराव पाटील देवसरकर यांनी केला. हिमायतनगर तालुक्यातील धानोरा, वारंग, टाकळी या गावांमध्ये भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने या भागात अतिवृष्टीमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आणि शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालवणेही कठीण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
या गंभीर परिस्थितीत स्थानिक आमदारांनी अद्यापपर्यंत या गावांना भेट दिलेली नाही किंवा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की, त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे आणि तातडीने मदतीसाठी पुढाकार घ्यावा. तसेच सरकारने या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित लक्ष देऊन नुकसान भरपाईसाठी आणि पुनर्वसनासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
तालुक्यातील अतवृष्टीग्रस्त भागाला आज माधवराव पाटील देवसरकर यांनी भेट देऊन या गावांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तत्काळ कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोनवर संपर्क साधून या भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी केली आहे.