भोकर – (गंगाधर पडवळे) सुधा नदीच्या पात्रात दोन तरुण पोहायला गेले असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते, त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह दि. ४ बुधवारी सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेत असतांना दि. ५ सप्टेंबर गुरुवारी मृतदेह मिळाला असल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली आहे.
दि. ३ सप्टेंबर रोजी मौजे रेनापुर येथील दोन तरुण नामे श्रीनिवास भरत मुळेकर (वय २० वर्षे) व यश संदीप भगत (वय २१ वर्ष) हे सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व पाण्याचा अंदाज न आल्याने पोहणारे दोन्ही युवक दुपारी दोनच्या सुमारास नदी पात्रातून वाहून गेले होते. भोकरच्या अप्पती व्यवस्थापन कक्षास माहिती मिळताच प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली होती परंतु रात्रभर शोध घेऊनही शोध लागला नाही, अखेर दि. ४ सप्टेंबर बुधवारी दुपारी त्यातील एक तरुण श्रीनिवास भरत मुळेकर याचा मृतदेह कोळगाव खु.च्या शिवारात सापडला असुन हा मृतदेह काढण्यासाठी बाबाराव टोकलवाड, बालाजी गाडेवाड,विठ्ठल टोकलवाड रा. कोळगाव खु. येथील भोई पथकाने मोलाचे सहकार्य केले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे करून मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला होता. तर दुसऱ्या बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून मंडळ अधिकारी कंधारे, तलाठी जाधव, ग्रामसेवक भारती, पोलीस कर्मचारी हणवते व गावकऱ्यांच्या वतीने युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू होते.
दरम्यान SDRF टीम कोळगाव खु. पासून ते कोळगाव बु. पर्यंत आली. आणि भोई पथक रेणापूर पासून कोळगाव बु. कडे शोध घेत असतांना रेणापूर व कोळगाव बु. या मध्यभागी म्हणजे शिवेवर बेपत्ता दुसरा युवक ज्याचे नाव यश संदीप भगत यांचा मृत्यदेह आज दि. ५ सप्टेंबर गुरुवारी बरा वाजेच्या सुमारास सापडला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सदरील कारवाईत भोई पथकाने महत्वाची भूमिका बजावली असून अतिशय भयावह परिस्थितीत हे मृतदेह शोधून काढणे अवघड होते ते त्यांनी यशस्वी केले.
या पथकात बालाजी पोशट्टी गोडवाड, नागा लक्ष्मण टोपलवाड, बालाजी लक्ष्मण टोपलवाड, पांडूरंग रामजी गादेपवाड, विठ्ठल सायन्ना टोकलवाड, पेंटाजी मारोती गाडेवाड हे होते तर शासनाने SDRF पथकाला ही पचारण करून त्यांनी ही अतिशय मेहनत घेऊन या कामी मदत केली त्यात प्रशांत राठोड PSI , SDRF, धुळे टीम क्र. 2
सुधीर शिरसाठ PSI, SDRF,अधिकारी -2,अंमलदार – 15 यांचा समावेश होता तर स्थानिक म्हणून प्रभावी यंत्रणा राबविण्यात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ते भोकर चे तहसीलदार सुरेश घोळवे त्याचं बरोबर मंडळ अधिकारी मनोजकुमार खंदारे, तलाठी रुपेश जाधव, तलाठी ए.एम.सुर्यवंशी, रेणापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विकास भारती, पत्रकार राजेश चंद्रे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड ,पो. हे.का. राजेश्वर कळणे, होमगार्ड गजानन सिद्धेश्वर, आनंद चव्हाण, गावचे पोलीस पाटील श्रीराम सुर्यवंशी , बालाजी पांचाळ पोलीस पाटील कोळगाव बालाजी चिंतावार, पोलीस पाटील कोळगाव खु. या सह अनेक गावकरी, नातलग यांची मदत लाभली, बुधवारी श्रीनिवास मुळेकर वर तर गुरुवारी यश भगत यांचावर उत्तरीय तपासणी करून अतिशय दुःखद वातावरणात रेणापूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. एकाच वेळी दोन्ही कुटूंबातील एकुलते एक तरुण मुलं गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या पुरातून जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच आपली गुरेढोर सुद्धा पुरातून नेण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना वारंवार सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.