हिमायतनगर| हदगाव – हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कोणत्याही प्रकारचे पंचनामे करणे करता हदगाव हिमायतनगर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा भावी आमदार गजानन तुपतेवार यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड अतिवृष्टी झाली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला. या पुराच्या पावसामुळे शेती पिकात पाणी साचून राहिल्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, हळद आदींसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी बांधव हतबल झाला असून, त्यांना या नुकसानीतून बाहेर करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
तसेच शहरासह ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे आणि विजांचा कडकडाट होऊन तसेच शोक लागून शेतकऱ्यांच्या जनावरे दगावली आहेत. यांचा देखील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये होत्याचे नव्हते झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हि आर्थिक संकटाची परिस्थिती लक्षात घेऊन हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भारवी अशी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रति त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, तहसीलदार हिमायतनगर, आणि संबंधितांना दिले आहे. या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, प्रदेश समन्वयक वैद्यकीय आघाडी डॉ.प्रसाद डोंगरगावकर, भाजप युवा मोर्च्याचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परमेश्वर सूर्यवंशी, भाजप ओबीसी तालुकाध्यक्ष राम पाकलवाड, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विकास विक्रम, दि.बी.पाटील, अभिलाष जैस्वाल आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
