हिमायतनगर – नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर(वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान ट्रस्टमध्ये तात्पुरते सदस्य म्हणून कार्यरत असलेले अनिल मादसवार व अ़ॅड दिलीप राठोड यांची आता आजीव सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हि निवड गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली असल्याचे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी जाहीर केले आहे.
विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात हरिहर अवतारात श्री परमेश्वराची उभी मूर्ती आहे. सर्वांग सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती भारतात इतरत्र कुठेही आढळून येत नाही असे आत्तापर्यंत मंदिरास भेट दिलेल्या अनेक साधू, संत महंत व जुने जाणकार मंडळी सांगतात. श्री परमेश्वर मंदिराचा कारभार ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून परंपरेनुसार चालविला जात असून, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे काम श्री परमेश्वर देवस्थान संचालक मंडळाने करून मंदिराच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याने मंदिराचे वैभवात दिवसेंदिवस भर पडत आहे.

मागील काळात मंदिराचे जेष्ठ सदस्य स्व. विठ्ठलराव जाधव आणि लक्ष्मणराव शक्करगे यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आजीव सदस्य निवडणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेऊन मंदिराच्या कार्यात मागील ८ वर्षांपासून तात्पूरते सदस्य म्हणून हिरिरीने सहभागी होऊन धार्मिक कार्य करणारे अ़ॅड दिलीप राठोड व पत्रकार अनिल मादसवार यांची निवड करण्यात आली आहे. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या सभागृहात सर्व संचालक मंडळाची दिनांक १७ रोजी ११ वाजता वार्षिक महत्वपूर्ण सभा घेण्यात आली. या सभेत मागील वर्षभरात झालेल्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच यात्रा उत्सव काळात आणि मराठी नववर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या अहवालाचे वाचन करून विविध सात ठराव घेण्यात आले.
यात सर्वानुमते देवस्थान ट्रस्ट मधील नियम १५ च्या प्राप्त अधिकारानुसार आजीव सदस्य म्हणून अनिल लक्ष्मणराव मादसवार, अ़ॅड दिलीप रेड्डी राठोड यांची निवड करण्यात आली. निवडीने त्यांच्यावरील मंदिराच्या कामकाजाची जबाबदारी आणखी वाढली असून, जास्तीत जास्त वेळ देऊन मंदिराच्या कार्यात सहभागी व्हावे अश्या सूचना मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिल्या. याप्रसंगी सेक्रेटरी अनंता देवकते, जेष्ठ संचालक प्रकाश कोमावार, जेष्ठ संचालक प्रकाश शिंदे, जेष्ठ संचालक वामनराव बनसोडे, जेष्ठ संचालक राजाराम झरेवाड, जेष्ठ संचालिका मथुराबाई भोयर, जेष्ठ संचालिका लताबाई मुलंगे, तसेच संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, मंदिराचे लिपिक बाबुराव भोयर, सहकारी लिपिक प्रकाश सभळकर, कर्मचारी देवराव वाडेकर, विजय दळवी, बालाजी बनसोडे, आदींसह अनेकांनी आजीव सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
