दिनांक २४ फेब्रुवारी ते १२ मार्च पर्यंत चालणार महाशिवरात्र २०२५ चा यात्रा महोत्सव
विविध स्पर्धेसाठी ७ लाखांच्या बक्षिसाबरोबर सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांना होणार गौरव
पशुप्रदर्शन, शंकरपट, शालेय व महिलांच्या स्पर्धा, कुस्ती, कब्बडी व भजन स्पर्धेचे आयोजन
हिमायतनगर – वाढोणा – वारणावती – हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र परमेश्वराची महाशिवरात्र महोत्सव २०२५ ची जय्यत तयारी सुरु आहे. दिनांक २४ फेब्रुवारी ते १२ मार्च या १५ दिवसाच्या कालावधीत यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, श्री परमेश्वर मंदिर कमेटीकडून जय्यत तयारी अंतिम टप्यात आली आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयी स्पर्धकांना तब्बल ७ लाख रुपयांची बक्षीसे आणि श्री परमेश्वराची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या यात्रा महोत्सवाचा व्यापारी, दुकानदार, खेळप्रेमी, पशुप्रेमी, कलावंत, भजनी मंडळ व पंचक्रोशीतील यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ व सर्व संचालक मंडळींनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार याही वर्षी श्री परमेश्वराच्या महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात दिनांक २४ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने होणार आहे. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ शिवाजी महाराज जाधव वडगावकर हे सांभाळणार आहेत. दरम्यान महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजे दिनांक २६ रोजी रात्री १२ ते ३ च्या रम्यान श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते श्री परमेश्वराचा अभिषेक महापुजा आणि पाच पुरोहिताच्या वेदशास्त्र मंत्रोच्चाराच्या मंगलमय सोहळ्यात श्रीचा अलंकार सोहळा संपन्न होणार आहे. दुसऱ्या दिवशीपासून ते दहीहंडी काल्याच्या दिवशीपर्यंत भाविक भक्तांना श्रीचे अलंकारमय दर्शन घेता येणार आहे. दिनांक ०३ मार्च रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य पालखी मिरवणूक टाळा मृदांगच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणार आहे. त्यानंतर काल्याच्या कीर्तन होणार असून, सप्ताहाचा समारोप बुंदी व काल्याचा प्रसाद वितरणाने केला जाणार आहे. दरम्यान दिनांक २५ ते ०३ मार्च पर्यंत दररोज रात्रीला ब्राम्हण, मराठा, माळी, आर्यवैश्य, पद्मशाली, वीरशैव समाजच्या वतीने पारंपरिक पंगत होणार आहे.
सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होणार आहे. दरम्यान रात्रीला ९ ते ११ या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार असून यात सोमवार दिनांक २४ रोजी मयूर महाराज कोंडे पुणेकर, मंगळवार दिनांक २५ रोजी कोंडिबा महाराज पासदगावकर, बुधवार दिनांक २६ रोजी म्हणजे महाशिवरात्रीला बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज मधापुरी मठ संस्थान अमरावती, गुरूवार दिनांक २७ रोजी महेश महाराज महाजन आळंदी, शुक्रवार दिनांक २८ रोजी व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर महाराज खोडे दिग्रस, शनिवार दिनांक ०१ मार्च रोजी गुरूवर्य तानाजी बापू महाराज मुडाणा, रविवार दिनांक ०२ रोजी नारायण महाराज गरड आणि सोमवार दिनांक ०३ रोजी दुपारी १ ते ४ वाजेच्या दरम्यान काल्याचे कीर्तन सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोली यांच्या मधुर वाणीतून होणार आहे.
कीर्तनानंतर लगेच राधा कृष्ण झाकीच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येऊन भव्य बुंदी आणि काल्याच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्रीला बैलगाडीतून शहरातील मुख्य रस्त्याने राधा कृष्ण झाकीची मिरवणूक ढोल ताश्याच्या गजरात काढली जाणार आहे. महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवार दिनांक ४ रोजी शालेय बडबड गीत स्पर्धा, बुधवार दिनांक ५ रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा, गुरूवार दिनांक ६ रोजी भव्य पशू प्रदर्शन स्पर्धा, शुक्रवार दिनांक ७ रोजी भव्य शंकरपट स्पर्धा, शनिवार दिनांक ८ रोजी भव्य भजन स्पर्धा, रविवार दिनांक ९ रोजी भव्य कब्बडी स्पर्धा आणि शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा (सांस्कृतिक कार्यक्रम), सोमवार दिनांक १० रोजी लहान मुले व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा, आणि मंगळवार दिनांक ११ रोजी कुस्ती शौकिनांसाठी शेवटची भव्यदिव्य अशी कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहे. तब्बल ७ लाखांच्या निधीतून यात्रेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस, श्रीची प्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार जाणार आहे. दिनांक १२ रोजी म्हशीव्रतारी यात्रेचा समारोप यात्रा उत्सव काळात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा स्वागत सत्कार करून केला जाणार आहे.
एकूणच भव्य यात्रा महोत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात आली असून, मंदिराची रंगरंगोटीचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. शुद्ध पाणी, स्वच्छता ग्रह, भोजन कक्ष, दर्शन रांगा, देणगी कक्ष, विविध १६ प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे अवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक राजेश्वर चिंतावार, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, श्याम पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, माधवराव पाळजकर, मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, अ़ॅड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुतलवाड, लिपिक बाबुराव भोयर आदींसह गावकरी मंडळी व यात्रा सब कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
