हिमायतनगर – मनोकामना पूर्ण करणाऱ्या माता कालिंका मंदिरात कोजागिरी पोर्णिमेपासून सुरु करण्यात आलेल्या काकडा आरतीला पंचक्रोशीतील महिला मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पिढ्यान पिड्या चालत आलेली परंपरा जोपासत काकडा आरतीबरोबर हरिपाठ, विविध कार्यक्रम साजरे केले जात असल्यामुळे श्री कालिंका मंदिर परिसरात सकाळच्या प्रहरी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदू धर्मात देवी – देवाला जागीकरण्यासाठी रामप्रहरी केली जाणारी आरती म्हणजे काकडा आरती केली जाते. महिनाभर चालणाऱ्या काकडा आरतीला परिसरातील महिला मंडळी सकाळच्या रामप्रहरी घरासमोर सडा – सारवन, रांगोळी काढून नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात एकत्र होतात. देवीच्या मूर्तीं समोर काकडा ज्योत ओवाळत काकडा आरती केली जाते. तत्पूर्वी कालिंका मातेचा अभिषेक पूजा आणि त्यानंतर धार्मीक गीते गाऊन काकडा आरतीला सुरुवात होते.
आरतीनंतर विविध भजने, आरती व स्तोत्रे म्हटली जातात. श्री परमेश्वर मंदिरातून निघालेली काकडा दिंडीचे आगमन झाल्यानंतर शेवटची आरती होते. त्यानंतर पसायदान घेत काकडा आरतीचा समारोप केला जातो. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आलेल्या काकडा आरतीचा समारोप कार्तिक पौर्णिमेला भव्य महाप्रसादाने केला जाणार हे. काकडा आरतीनंतर महिला मंडळी शहरातील सर्व देवी देवतांच्या दर्शन करून पुण्य पदरी पाडून घेतात. काकडा आरतीच्या उपक्रमाला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. आगामी पंधरा दिवसाच्या काळात काकडा आरतीला जास्तीत जास्त महिला मंडळींनी भक्ती भावाने उपस्थित होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कालिंका मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.