सानुग्रह अनुदान २० हजार रुपये,५० किलो अन्न धान्याची किट, दोन ड्रेस, दोन साड्यांची करणार मागणी
नांदेड – ३१ ऑगस्टच्या रात्री पासून ३ सप्टेंबर पर्यंत नांदेड शहरात मुसळधार पावसाने थैमान घालून अतिवृष्टी निर्माण झाली आणि नदी काठावरील व सखल भागात राहणाऱ्यांच्या संसाराचे दोन दिवसात होत्याचे नव्हते झाले.
त्या सर्व नुकसानग्रसतांना आणि पीडित पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान पोटी २० रुपये आणि १४ जीवनावश्यक वस्तूंची रेशन किट, दोन ड्रेस,दोन साड्या तसेच विद्यार्थ्यांना बाल मदत देण्याची मागणी सीटू संलग्न मजदूर युनियनने २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन केली आहे.
त्या निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन,राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त,पोलीस अधीक्षक, तहसीलदार नांदेड आणि वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती तेव्हा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने शहरातील सभासद असलेल्या भागात सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची मागणी करीत पूरग्रस्तांना रोख २० हजार रुपये आणि ५० किलोग्रॅम अन्न धान्याची रेशन किट देण्यात यावी अशी मागणी केली होती.
तेव्हा मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी नांदेड शहरातील पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये मंजूर केले होते.
सीटूच्या कार्यकर्त्यांनी अविरत मेहनत करून ३५ वेळा वेगवेगळी आंदोलने व २१० दिवस साखळी उपोषण करून निधीची तरतूद करून अनुदान वाटप करण्यास प्रशासनास भाग पाडले होते.
गेल्यावर्षी मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठ्याप्रमाणात बोगस पूरग्रस्तांना अनुदान लाटण्याची संधी मिळाली. यावर्षी तसे होऊ नये यासाठी वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज आहे.
यावर्षी देखील पुराच्या पाण्यात शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य,अन्न धान्य,कपडा लता,घरातील जीवनावश्यक वस्तू, इतर साहित्य व काही महत्वाच्या वस्तू पुराच्या पावसामुळे खराब झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने २० हजार रुपये, अन्न धान्य किट, दोन ड्रेस,दोन साड्या व विद्यार्थ्यांना बाल मदत स्वरूपात सानुग्रह अनुदान पोटी नैसर्गिक आपत्तीचे अनुदान तातडीने देण्यात यावे ही मागणी सीटू च्या वतीने करण्यात येत आहे.
कामगारांच्या लेकरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे वेगळे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.विद्यार्थी अर्ज प्रक्रिया शुल्क केवळ १० रुपये राहिल.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावर्षी तात्काळ मदत केली जाईल असे आश्वासन दिले असून आठ दिवस उलटूनही अजून पंचनामे करण्यास सुरु झाली नसल्यामुळे दि.९ सप्टेंबर रोजी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्तांचा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे व अर्ज भरण्यात येतील.
अर्ज प्रक्रिया व सभासद नोंदणी व नूतनिकरण शुल्क केवळ ५० रुपये घेण्यात येतील. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अर्ज प्रक्रिया व सभासद नोंदणी सीटू कार्यालयात सुरु असून शहरातील सभासदांनी एमजीएम कॉलेज समोरील सीटू कार्यालय,संघर्ष भवन येथे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
ज्याच्या घरात पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे अशा सर्व पूरग्रस्तांनी रीतसर अर्ज भरून घ्यावेत आणि सोमवारी दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया वरून नांवाशमनपा येथे पोहचेल आणि तेथे फॉर्म दाखल केले जातील.