वडाचा गणपती, इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरातील गणपती, कोनाड्यातील गणपतीसह शहरातील सर्व गणपतीचे थाटात विसर्जन
हिमायतनगर| गणेशोत्सवाच्या११ व्या दिवशी अनंत चर्तुदशी दिनी दि.१७ सप्टेंबर मंगळवारी आल्याने दुपारी २ वाजता टाळ मृदुंग , ढोलताशा, डीजेच्या तालावर ठेका धरत वाजत गाजत निघालेली श्री गणपती बाप्पाची मिरवणूक रात्री उशिरा 03 वाजेपर्यंत सुरू होती. प्रथम शहरातील मानाचा श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणपती, वडाचा गणपती, येथील इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिरातील गणपती, कोनाड्यात गणपतीसह शहरातील अनेक गणपतीचे विसर्जन जड अंतकरणाने हर्ष उल्हासात चुकलमाकल पदरात टाकुन, सुखा समाधानाच मागन करत. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी…. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी.. अशी याचना करत गणपती बाप्पाला निरोप दिला.
मंगळवारी अकराव्या दिवशी जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणेशाची पालखी मिरवणूक टाळ – मृदंगाच्या गजरात व ढोल – ताश्याच्या वाद्यात सकाळी ११ वाजता काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढल्यानंतर ठिकठिकाणी महिला पुरुष भाविकांनी मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनतर दुपारी १२.३० वाजता परमेश्वर ट्रस्ट कमेटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ यांचे हस्ते श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मंदिर कमिटीच्या सदस्यांसह भजनी मंडळी व बालगोपाळ सहभागी झाले होते. शहरातील प्रसिद्ध मानाच्या वडाच्या मंडळाच्या ठिकाणी गणेश भक्त संतोष वानखेडे यांनी खिचडी वितरण केलं, तर वडाच्या मंडळाच्या युवकांनी ५१ किलो लाडूच्या प्रसादाचे वाटप केले.
अनंत चतुर्थी निमित्त सर्वात प्रथम श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणेशाचे, वरद विनायक मंदिरातील गणेशाचे विसर्जन, त्यानंतर लहान बालकांच्या बाप्पाचे विसर्जन आनंदाने करण्यात आले. मुख्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघाली यावेळी गणरायाला निरोप देऊन शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला, पुरुष व बालभक्त रस्त्याच्या कडेला उभे राहून, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा गर्दी होती. इमारतींच्या खिडक्या, छतावर दाटीवाटीने गणेश भक्त उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतले.
दरम्यान नगरपंचायतीने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून मिरवणुकीतील अडथळा दूर केला, तसेच सतर्कता म्हणून अग्निशमन बंब, जीव रक्षक पथक, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी विजेचे खांब लावून अंधार दूर करून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील अडथळे दूर करण्यात आले. दरम्यान मिरवणुकीत सामील झालेल्यांसाठी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने मिरवणूकित कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख बंदोबस्त लावला होता. विसर्जन स्थळाच्या ठिकाणी नगरपंचायतीचे कक्ष अधिकारी चंद्रशेखर महाजन, पोलीस निरीक्षक अमोल भगत, महाविरचंद श्रीश्रीमाळ, आमदार जवळगावकर, आदींसह अनेक अधिकारी कर्मचारी, पत्रकारांनी भेट देऊन श्री विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.