हदगाव – तालुक्यातील मारलेगाव येथे नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीत गावातील सुमारे १५ घरे पूर्णपणे उध्वस्त झाली असून, गावकऱ्यांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.
आपत्तीत नागरिकांना मदत करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. पिडीत कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. या किटमध्ये आवश्यक अन्नधान्य, किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून गावकऱ्यांना या कठीण प्रसंगी थोडासा आधार मिळू शकेल.
या मदतकार्यादरम्यान माधवराव पाटील देवसरकर यांनी सांगितले, “आपत्तीच्या काळात एकत्र येऊन मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या गावातील नागरिकांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत.” त्यांनी आणखी मदतीचे आश्वासन दिले आहे व सरकारी यंत्रणांकडेही आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
स्वराज्य पक्षाच्या या तातडीच्या मदतीमुळे गावकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. प्रशासनानेही लवकरात लवकर या गावात पुनर्वसनाचे उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे.